यारों

 अता दगदग पुरे झाली करा थोडी मजा यारो. 

खुणेने साकीया सांगे, रिते प्याले भरा यारो


कुणावरही नका भाळू कुणी नाही भरोशाचे

बघा तो आरसा आणिक स्वतःवर व्हा फिदा यारो


असे येतो असे जातो दखल ना आमची कोणा 

नसे इतिहास आम्हाला न कुठलीही कथा यारो


असर  ह्या धर्मगोळीचा अरे आहे केवढा जालिम

सदा ग्लानीत का जो तो न उतरे नशा यारो


शिळी झालीत रे तुमची पुराणातील ती वांगी

किती फसवाल आम्हाला खऱ्या पोथ्या लिहा यारो


बघा डोकावुनी आपण स्वत:च्या आत केव्हाही

तिथे ईश्वर तिथे येशू तिथे आहे खुदा यारो

Comments