चल जावू या


चल जावू या सोबत सजणी मागे पुढे नको
मिसळू आपण आता माझे तुझे नको

मी आत्मा अन तू परमात्मा साक्षात साजणी
भीती आणिक लज्जेचे मग पडदे मधे नको

मी अपराधी मान्य मला हे दे तू स्वत: सजा
ती पंचायत ते न्यायालय खोटे खरे नको

उचलुन घेतो माझी छाया माझ्यासवे अता
माझे ह्या धरतीवर काही मागे ठसे नको

नाविन्याच्या आशेने मी वेडावलो असा
विरघळलेले जे ते मजला कापड जुने नको.

मंबाजी तर अवतीभवती दिसती सदा मला
त्यांना ज्ञाना,नाथा चोखा तुकया म्हणे नको


Comments