चुकी जाहली
ईश्वर होते तुला मानले चुकी जाहली
तत्पर होते तुला मानले चुकी जाहली
तुला पाहता जखमांचा का दाह वाढतो
फुंकर होते तुला मानले चुकी जाहली
किती काळ मी वाट बघावी न्यायदेवते
सत्वर होते तुला मानले चुकी जाहली
टोचतात का काटे तुजला अगम्य आहे
शायर होते तुला मानले चुकी जाहली
तूच मला का प्रश्र्न विचारी रोज जीवना
उत्तर होते तुला मानले चुकी जाहली
इतका का रे बिभत्स झाला यमदेवा तू
सुंदर होते तुला मानले चुकी जाहली
जन्मापासून सोबत का गं तूझी वेदने
क्षणभर होते तुला मानले चुकी जाहली
सांग माणसा कसा निघाला जंगम रे तू
स्थावर होते तुला मानले चुकी जाहली
Comments
Post a Comment